ऊस वाहतूकदारांनो, नियम पाळा; अपघात टाळा! कर्जत पोलिसांचा पुढाकार
अंबालिका साखर कारखान्यात वाहनचालकांची विशेष बैठक; पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांचे मार्गदर्शन, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना कारखान्यात प्रवेश बंद!
राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी)

ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने कर्जत तालुक्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व इतर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते अपघात रोखण्यासाठी कर्जत पोलिसांनी पुढाकार घेत बारडगाव सुद्रीक येथील अंबालिका साखर कारखान्यात ऊस वाहतूकदार व वाहनचालकांची विशेष बैठक घेतली.

पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी कारखाना व्यवस्थापनासह वाहनचालकांना सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दारू पिऊन वाहन चालवू नये, ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात टेप लावू नये, वाहनांचा विमा उतरवावा, मागील बाजूस रिफ्लेक्टर बसवावेत, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि वैध वाहन परवाना सोबत ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच रस्त्यात वाहन बंद पडल्यास मागील वाहनांना सूचना मिळण्यासाठी योग्य दर्शक चिन्हे लावण्याचे आवाहन करण्यात आले.
रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना प्रवेश बंद!
बैठकीत अंबालिका साखर कारखान्याचे एमडी चौगले यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. ज्या ऊस वाहतूक वाहनांच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर बसवलेले नसतील, अशा वाहनांना कारखान्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कारखान्याचे मुख्य संचालन अधिकारी जंगल वाघ, जनरल मॅनेजर भोसले, सिव्हिल इंजिनिअर खताळ, मुख्य शेतकी अधिकारी चाकणे, ऊस विकास अधिकारी शिंदे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मुळीक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, अमोल रायकर, किरण बोराडे व ट्रॅफिक अंमलदार सुरेश लोंढे उपस्थित होते.
ऊस हंगामात विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर व ट्रॉलींची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. अशा वेळी रिफ्लेक्टरचा अभाव आणि निष्काळजी वाहनचालना अपघातांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून स्वतःसह इतर नागरिकांचाही जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन कर्जत पोलिसांकडून करण्यात आले.

















