कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त!
कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा; तीन गायींची सुटका, एक आरोपी ताब्यात तर दुसरा फरार
राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी

कत्तलीच्या उद्देशाने तीन जर्सी गायींची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या वाहनावर नगर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गायींची सुटका केली आहे. या कारवाईत ३ लाख रुपये किमतीचा टाटा छोटा हत्ती टेम्पो आणि ३० हजार रुपये किमतीच्या तीन गायी, असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा आरोपी फरार आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गणेश वारुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रभारी अधिकारी गणेश वारुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एमएच २३ एयू ४२२६ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या टाटा छोटा हत्ती टेम्पोमधून तीन जर्सी गायी पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून कत्तलीसाठी नेल्या जात आहेत. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला सतर्क करून कामरगाव घाट परिसरात सापळा रचला.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित टेम्पो पोलिसांच्या पथकाला दिसताच तो थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये तीन जर्सी गायी अत्यंत निर्दयीपणे जखडून बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. गायींना हालचाल करता येणार नाही, अशा पद्धतीने बांधण्यात आले होते. तसेच त्यांना अन्न-पाणी न देता उपासमारीच्या अवस्थेत वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने तिन्ही गायींची सुटका केली.
वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सागर भाऊसाहेब कोकणे (वय २८, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) असे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, लोणी माळा, ता. पारनेर येथून रेहान कुरेशी (रा. बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे) याने या गायी टेम्पोमध्ये भरून दिल्या होत्या. त्या आष्टी येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी १० हजार रुपये किमतीची काळ्या-पांढऱ्या रंगाची जर्सी गाय, १० हजार रुपये किमतीची पांढऱ्या-काळ्या रंगाची जर्सी गाय, १० हजार रुपये किमतीची तांबड्या रंगाची जर्सी गाय आणि ३ लाख रुपये किमतीचा टाटा छोटा हत्ती टेम्पो असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोघांविरुद्ध गुन्हा; एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९५९/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सागर कोकणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रेहान कुरेशी हा फरार आहे.
या धडक कारवाईत प्रभारी अधिकारी गणेश वारुळे, सहायक फौजदार दत्तात्रय हिंगडे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश खरमाळे व पोलीस ठाण्यातील नेमणूक स्टाफ यांनी सहभाग घेतला.
पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचा आरोप असलेल्या तीन गायींची सुटका झाली असून, फरार आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

















