जिद्द, चिकाटी अन् अभ्यासाच्या बळावर डॉ. जगदिश सोनवणे यांची प्राध्यापकपदाला गवसणी!

MPSC मधील यशातून कर्जतच्या तरुणांसमोर उभा केला शैक्षणिक गुणवत्तेचा आदर्श
राशीन ( प्रतिनिधी ऋषभ परदेशी ) : ध्येय निश्चित असेल, अभ्यासात सातत्य असेल आणि प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच गाठता येतो, हे कर्जतचे सुपुत्र डॉ. जगदिश छबुराव सोनवणे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांची अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या इतिहास विभागात प्राध्यापकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कर्जत तालुक्यातील स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या युवकांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
डॉ. सोनवणे यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात मेहनत, अभ्यासू वृत्ती आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा कायम जपली. त्यातूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेत यश मिळवत त्यांनी शासकीय प्राध्यापकपदापर्यंत मजल मारली. नुकतेच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभारही स्वीकारला आहे.
ते दिवंगत शिक्षण विस्तार अधिकारी छबुराव सोनवणे यांचे सुपुत्र आणि माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांचे भाचे आहेत. कुटुंबाकडून मिळालेल्या शैक्षणिक संस्कारांना स्वतःच्या कर्तृत्वाची जोड देत त्यांनी हे यश संपादन केले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रवी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही उच्च पदांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
आज स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अनेक विद्यार्थी संघर्ष करत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ. सोनवणे यांचे यश हे केवळ अभिनंदनाचा विषय नसून ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश देणारे आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य संधी आणि मेहनतीची जोड मिळाल्यास ती राज्यस्तरावर आपले स्थान निर्माण करू शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
डॉ. सोनवणे यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत

















