*मिरजगाव सरकारी हॉस्पिटल शेजारी अवैध मावा गुटखाचा विक्रीचा गोरखधंदा ?*
*जागरूक नागरिकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गोपनीय तक्रार, चौकशीची मागणी*

*मिरजगाव, ता. कर्जत :* मिरजगाव येथील सरकारी हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या एका टपरीवर प्रतिबंधित माव्याची उघडपणे विक्री सुरू असल्याची गंभीर तक्रार एका जागरूक नागरिकाने पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर (ग्रामीण) आणि सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, हॉस्पिटलसारख्या वर्दळीच्या आणि संवेदनशील ठिकाणी ही विक्री सुरू असूनही स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्याने आर्थिक हितसंबंधाचा संशय व्यक्त केला जात आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, तसेच परिसरातील विद्यार्थी आणि तरुण या विक्रीच्या संपर्कात येत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
तक्रारदाराने आपल्या वैयक्तिक सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले नाव गोपनीय ठेवण्याची विनंती केली आहे. व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन कायद्यानुसार तक्रारदाराचे नाव, गाव आणि संपर्क तपशील गुप्त ठेवण्यात यावेत, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच माहिती अधिकारात देखील नाव उघड करू नये, असे स्पष्ट नमूद केले आहे.
तक्रारीत पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
१. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवावे.
२. चौकशी कर्जत पोलीस स्टेशन मार्फत न करता वरिष्ठ पथकामार्फत करावी, जेणेकरून स्थानिक दबावाचा चौकशीवर परिणाम होणार नाही.
३. संबंधित टपरीवर छापा टाकून माल जप्त करून गुन्हा दाखल करावा.
सोबत मावा विक्रीचे फोटो पुरावा म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या तक्रारीमुळे मिरजगाव परिसरात खळबळ उडाली असून, आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हॉस्पिटल शेजारी असा अवैध धंदा चालू असेल तर तो तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

















