### कपाशीच्या शेतात गांजाची शेती; पोलिसांचा छापा, ३१ लाखांचा गांजा जप्त!

### गुरवपिंप्री येथे मिरजगाव पोलिसांची संयुक्त कारवाई; ६३ किलो ६५५ ग्रॅम गांजासह शेतमालकास अटक
राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी)
कपाशीच्या पिकाआड गांजाची लागवड करून अवैध व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार गुरवपिंप्री (ता. कर्जत) येथे उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मिरजगाव पोलिसांनी संबंधित शेतावर छापा टाकून तब्बल ६३ किलो ६५५ ग्रॅम गांजा, असा एकूण ३१ लाख ८२ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तात्याराम भिकाजी गावडे (रा. गावडेवाडी, गुरवपिंप्री) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना गुरवपिंप्री येथील एका शेतात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर माहितीची खातरजमा करून कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि मिरजगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी कपाशीच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी ६३ किलो ६५५ ग्रॅम गांजा जप्त करून शेतमालकाला ताब्यात घेतले.
याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९४/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे यांच्यासह मिरजगाव पोलीस ठाणे व कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा किंवा अन्य अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक अथवा विक्री होत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कपाशीच्या पिकाआड सुरू असलेली गांजाची शेती उघडकीस आणत पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला महत्त्व
पूर्ण यश मिळाले आहे.

















