spot_img
spot_img
spot_img

श्रीगोंदा तालुक्यात सिना धरणाच्या हद्दीत माती चोरीचा कळस; पाटबंधारे विभागाच्या आशीर्वादाने अवैध उत्खनन सुरूच*

*श्रीगोंदा तालुक्यात सिना धरणाच्या हद्दीत माती चोरीचा कळस; पाटबंधारे विभागाच्या आशीर्वादाने अवैध उत्खनन सुरूच*

 

*अहिल्यानगर – मौजे थिटे सांगवी येथे गट नंबर 114 मधून JCB ने मातीची चोरी करून विक्री, महसूल व पर्यावरण कायद्याचा भंग; पिडीत शेतकऱ्याची तहसीलदार, पोलिस, जिल्हाधिकाऱ्यांकडे FIR ची मागणी, 7 दिवसात कारवाई नाही झाल्यास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा*

*श्रीगोंदा  (प्रतिनिधी) सागर शेळके.                                                                                                           -* श्रीगोंदा तालुक्यातील सिना धरणाच्या बुडीत आणि हद्दीतील जमिनींवर माती चोरांचा सुळसुळाट सुरू असून, याला थेट सिना पाटबंधारे उपविभाग, मिरजगाव (ता. कर्जत) या पाटबंधारे विभागाचाच आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मौजे थिटे सांगवी, ता. श्रीगोंदा येथील सिना धरणाच्या हद्दीतील गट नंबर 114 मधील जमिनीतून मोठ्या प्रमाणात माती JCB च्या साहाय्याने खोदून चोरून विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित जमीन मालक असलेल्या एका शेतकऱ्याने (अर्जदाराच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) तहसीलदार श्रीगोंदा, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा, जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि उपविभागीय कार्यकारी अभियंता, सिना पाटबंधारे उपविभाग मिरजगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

*नेमका प्रकार काय?*

तक्रारदार शेतकऱ्याच्या अर्जानुसार, त्यांच्या मालकीची जमीन मौजे थिटे सांगवी येथे सिना धरणाच्या हद्दीत गट नंबर 114 मध्ये आहे. या जमिनीचे ते स्वतः वहिवाटदार आहेत. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत, त्याच गावातील एका व्यक्तीने कोणतीही परवानगी न घेता, त्यांच्या गट नंबर 114 मधील जमिनीतून मोठ्या प्रमाणात माती JCB मशीन लावून खोदून काढली आणि बाहेर ट्रॅक्टर, डंपरद्वारे विक्री केली.

 

हा प्रकार केवळ माती चोरी नसून, हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्याचे थेट उल्लंघन आहे. सिना धरणासारख्या संवेदनशील क्षेत्रात, धरणाच्या हद्दीत कोणतेही खोदकाम करायचे असेल तर पाटबंधारे विभाग, महसूल विभाग आणि पर्यावरण विभागाची लेखी परवानगी बंधनकारक असते. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नाही, कोणताही ई-टीपी, कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

 

*GPS पुरावे सोबत जोडले*

तक्रारदाराने या प्रकरणाचे अत्यंत भक्कम पुरावे म्हणून GPS फोटो तक्रारीसोबत जोडले आहेत. दिनांक 08/09/2026 रोजी सकाळी 10:33 आणि 10:34 वाजता काढलेले हे फोटो आहेत. यामध्ये अक्षांश – रेखांश स्पष्टपणे दिसत आहेत – Lat: 18.823273, Long: 74.920862 आणि Lat: 18.822776, Long: 74.921027. फोटोंमध्ये धरणाच्या पाण्यालगत असलेली जमीन अक्षरशः उकरून काढलेली दिसते, खोल खड्डे पडलेले दिसतात, आणि बाजूला शेती पीक असूनही बेकायदेशीर उत्खनन केल्याचे स्पष्ट होते. एका फोटोमध्ये स्वतः तक्रारदार उभा असून, खोदलेल्या खड्ड्याची खोली आणि व्याप्ती किती मोठी आहे, हे लक्षात येते.

 

*तलाठ्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष*

या घटनेनंतर तक्रारदाराने पहिल्यांदा स्थानिक तलाठी कार्यालयात तोंडी तक्रार केली होती. मात्र तिथे कोणतीही कारवाई झाली नाही, उलट प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे नाईलाजाने त्यांना थेट तहसीलदार, पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली. अर्जाच्या प्रती माहितीस्तव जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा, कार्यकारी अभियंता, कुकडी वितरण बांधकाम विभाग कोळवडी आणि अधीक्षक अभियंता, कुकडी पाटबंधारे मंडळ, पुणे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

 

*पाटबंधारे विभागाच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही*

या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे उपविभागीय कार्यकारी अभियंता, सिना पाटबंधारे उपविभाग, मिरजगाव यांची भूमिका. सिना धरणाच्या हद्दीत एक ब्रास जरी माती काढायची असेल तर पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेशिवाय ते शक्यच नाही. धरण परिसरात सिंचन विभागाचे कर्मचारी, कालवे निरीक्षक नियमित गस्त घालत असतात. असे असताना JCB दिवसाढवळ्या तासंतास चालून, डंपरच्या फेऱ्या होऊन माती चोरी होत असेल, तर याला पाटबंधारे विभागाचा वरदहस्त असल्याशिवाय हे घडू शकत नाही, असा थेट आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. या माती चोरीतून लाखो रुपयांची अवैध कमाई होत असून, त्याचा वाटा वरपर्यंत जात असल्याची चर्चा थिटे सांगवी परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.

 

नियमानुसार धरणाच्या 500 मीटर हद्दीत कोणतेही गौण खनिज उत्खनन करण्यास सक्त मनाई आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी, पर्यावरण विभागाची NOC आणि पाटबंधारे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र लागते. परंतु येथे सर्व नियम धाब्यावर बसवून मातीचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

 

*आत्मदहनाचा इशारा*

प्रशासनाच्या चालढकल वृत्तीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदार शेतकऱ्याने आपल्या अर्जात अतिशय टोकाची भूमिका घेतली आहे. “सदर प्रकरणी 7 दिवसाच्या आत FIR दाखल करून माती चोरी, अतिक्रमण व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी कारवाई झाली नाही, तर मी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर आत्मदहन करणार आहे. याला संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

या इशाऱ्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. एका शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या जमिनीसाठी आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो, हीच बाब प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे द्योतक आहे.

 

*प्रशासन काय करणार?*

आता सर्वांचे लक्ष श्रीगोंदा तहसीलदार, श्रीगोंदा पोलीस आणि सिना पाटबंधारे उपविभाग मिरजगाव यांच्याकडे लागले आहे. GPS पुरावे, फोटो, आणि लेखी तक्रार असूनही जर यावर गुन्हा दाखल झाला नाही, तर हे प्रकरण उच्च न्यायालय आणि लोकायुक्तापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

अर्जदार यांनी माती चोरीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

सिना धरण हे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्याच्या शेतीसाठी वरदान आहे. अशा धरणाच्या हद्दीतच जर माती माफिया सक्रिय होत असतील आणि त्यांना पाटबंधारे विभागाचाच आशीर्वाद मिळत असेल, तर उद्या धरणाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल. त्यामुळे जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणाची SIT चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!