कर्जतमध्ये दुष्काळी उपाययोजनांसाठी शिवसेना आक्रमक!
पाणीटंचाईग्रस्त गावांत टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या; शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान व मजुरांना रोजगार देण्याची मागणी
राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :
कर्जत तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शिवसेना कर्जत तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांनी शेतकरी, पशुपालक आणि मजुरांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत दुष्काळी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली.

तालुक्यातील पाणीटंचाई सदृश परिस्थिती असलेल्या गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने दुष्काळग्रस्त सर्व गावांमध्ये तातडीने पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या
पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जनावरांसाठी चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करा
दुष्काळाचा फटका केवळ शेतीला नव्हे तर पशुधनालाही बसत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच प्रशासनाने चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाची मागणी
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी अनुदान व शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
मजुरांच्या हाताला काम द्या!
पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रोहयोअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू करून मजुरांच्या हाताला तातडीने काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“दुष्काळाची परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू कराव्यात. पाणी, चारा, रोजगार आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत या चारही आघाड्यांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे,” अशी भूमिका डॉ. नितीन तोरडमल यांनी मांडली.
शेतकरी, पशुपालक आणि मजुरांना दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी शिवसेना कर्जतच्या वतीने करण्यात आली आहे.

















