🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर शेळके ) अहिल्यानगर : महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली आणि मध्य प्रदेशात विक्रीसाठी असलेली विदेशी मद्याची मोठी खेप महाराष्ट्रात आणली जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नांदगाव शिवारात कारवाई केली. नगर–मनमाड महामार्गावरील हॉटेल जयविजयसमोर सापळा रचून दहा चाकी कंटेनर पकडण्यात आला. या कारवाईत दारूसाठ्यासह कंटेनर असा एकूण १ कोटी ७२ लाख ४२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निरीक्षक सुरज कुसळे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने तसेच ‘ब’ विभागाच्या पथकाने नांदगाव परिसरात नगर–मनमाड महामार्गावर सापळा रचला. संशयित RJ-32-GE-3013 क्रमांकाचा दहा चाकी कंटेनर थांबवून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा आढळून आला.
तब्बल १,२५० बॉक्समध्ये मद्यसाठा
जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये ७५० मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या ७,६३२ बाटल्या, १८० मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या १४,००० बाटल्या आणि १८० मिलीच्या बॅगपायपर व्हिस्कीच्या १६,०३२ बाटल्या आढळून आल्या. हा संपूर्ण साठा १,२५० बॉक्समध्ये असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.
या मद्याची महाराष्ट्रात विक्री करण्यास प्रतिबंध असून मध्य प्रदेशात त्याची विक्री वैध असल्याचे विभागाच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
चालक ताब्यात; विविध कलमांनुसार गुन्हा
या प्रकरणात कंटेनर चालक मुस्तकीम मुंशी खान (रा. धारड, ता. रतलाम, जि. रतलाम, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५(अ)(ई), ८१, ८३, ९० व १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुरज कुसळे, निरीक्षक बाबुराव घुगे, दुय्यम निरीक्षक ए.एन. जावळे, व्ही.जी. चव्हाण यांच्यासह जवानांच्या पथकाने केली.
अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुरज कुसळे पुढील तपास करीत आहेत.
अवैध मद्याबाबत माहिती देण्याचे आवाहन
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत नागरिकांकडे कोणतीही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001933 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

















