राशीनच्या शिव सायकरची अबॅकस स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी!

निगडी-पुणे येथील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक; प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव
राशीन प्रतिनिधी ऋषभ परदेशी . : महाराष्ट्र टीचर अबॅकस असोसिएशनच्या वतीने ३० ऑगस्ट २०२६ रोजी निगडी, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत राशीन येथील डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिक्षण घेणाऱ्या शिव अजिनाथ सायकर याने उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत त्याने आपल्या बुद्धिमत्तेची, गणितीय कौशल्याची आणि मेहनतीची प्रभावी छाप उमटवली. त्याच्या या यशामुळे राशीनच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहान वयातच अबॅकससारख्या कौशल्याधारित विषयात राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या शिवचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या यशाबद्दल आयोजित गौरवप्रसंगी त्याला गुलाबपुष्प, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवला डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या श्रीमती राधिका मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित सराव, जिद्द आणि मेहनत यांच्या जोरावर त्याने हे यश मिळवले. त्याच्या यशामागे शाळेने दिलेल्या प्रोत्साहनाचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या गौरवप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, दत्ता उकिरडे .ग्रामस्थ आणि मान्यवरांनी शिवचे विशेष कौतुक केले. यावेळी रोकडेश्वर माध्यमिक विद्यालय, नांदगावचे मुख्याध्यापक महादेव सायकर सर, राशीन येथील स्वामिनी टेक्स्टाईलचे सर्वेसर्वा अजिनाथ सायकर आणि त्यांच्या पत्नी अश्विनी अजिनाथ सायकर उपस्थित होते.
शिवच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबीयांसह शाळेचा नावलौकिक वाढला असून, त्याच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लहान वयात मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यातही शिवने अशाच प्रकारे विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून आपल्या शाळेचे, कुटुंबाचे आणि राशीनचे नाव उज्ज्वल करावे, अशा सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.

















