पाथर्डीतील शाळांच्या प्रश्नांवर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक!
जीर्ण शाळा, मूलभूत सुविधांचा अभाव आणि विद्यार्थ्याला मारहाणीच्या कथित प्रकरणावर प्रशासनाला अल्टिमेटम; १५ दिवसांत कार्यवाहीची मागणी
राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :
पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शैक्षणिक सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रश्नांवर कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

१७ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून जीर्ण इमारती, वर्गखोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी आणि वीज यासंबंधीच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींमध्ये प्रशासनाने विलंब न करता उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.

भांडेवाडीला सार्वजनिक वाचनालयाची मागणी
मोहरी अंतर्गत भांडेवाडी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाचनालयाची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वाचनालयास १५ दिवसांत मंजुरी देऊन ते कार्यान्वित करावे, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीने केली आहे.

विद्यार्थ्याला मारहाणीच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
जवखेडे खालसा येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी रूद्राक्ष बापूराव सोनवणे याला मुख्याध्यापक संदीप मचे यांनी मारहाण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हा आरोप गंभीर असल्याने त्याची तातडीने चौकशी करून दोष निश्चित झाल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पक्षाने संबंधित मुख्याध्यापकांच्या निलंबनाचीही मागणी केली आहे.
“१५ दिवसांत प्रश्न सोडवा; अन्यथा आंदोलन”
शाळांची पाहणी करून १५ दिवसांत दुरुस्ती व आवश्यक उपाययोजना, भांडेवाडी सार्वजनिक वाचनालयाला १५ दिवसांत मंजुरी, तसेच विद्यार्थ्याला मारहाण केल्याच्या कथित प्रकरणात दोन दिवसांत निलंबनाची कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दिलेल्या मुदतीत प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्यास कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आता पाथर्डी तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, संबंधित तक्रारींची चौकशी कशी होते आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

















