*शाळांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा*
राशीन प्रतिनिधी.. ऋषभ परदेशी
*ग्रामविकास विभागाच्या ४ मार्चच्या निर्देशांची अहिल्यानगर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी*

अहिल्यानगर प्रतिनिधी : 5,000 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहे व शाळा परिसराची नियमित स्वच्छता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत करण्याबाबत ग्रामविकास विभागाने 4 मार्च 2026 रोजी निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अहिल्यानगर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून प्रत्येक संबंधित शाळेची प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी दिपक पाचपुते यांनी केली आहे.
ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायती व शाळांमध्ये या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तालुकानिहाय तपासणी करणे आवश्यक असल्याचे पाचपुते यांनी म्हटले आहे.
केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छतागृहांची स्वच्छता, पाणीपुरवठा, वापरण्यायोग्यता, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच शाळा परिसरातील स्वच्छतेची पाहणी करावी. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण मिळणे आवश्यक असून, यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनाने नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील अनुसूचीनुसार शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा अपेक्षित आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेशी संबंधित ग्रामपंचायतींच्या जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने शासन निर्देशांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील 5,000 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती व त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांची तालुकानिहाय यादी तयार करावी, प्रत्येक शाळेची प्रत्यक्ष पाहणी करावी, स्वच्छतागृह व पाणीपुरवठ्याची स्थिती नोंदवावी आणि त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त पथकांमार्फत तपासणी करून त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्याकडे सादर करावा तसेच केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल उपलब्ध करून द्यावा, *अशीही मागणी दिपक पाचपुते यांनी केली आहे.*

















