घोगरगावात वीजप्रश्नावर शेतकरी आक्रमक; वेळापत्रकानुसार वीजपुरवठ्याची मागणी
नगर-सोलापूर महामार्ग रोखण्याचा इशारा; अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांच्या हस्तक्षेपानंतर तात्पुरता दिलासा
(राशीन) | प्रतिनिधी ऋषभ परदेशी

श्रीगोंदा तालुक्याच्या घोगरगाव परिसरात शेतीसाठी होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. महावितरणच्या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी घोगरगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रावर धडक देत आपली नाराजी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ठरलेल्या वेळेत वीजपुरवठा उपलब्ध होत नसून कधी मध्यरात्री, कधी पहाटे तर कधी दुपारच्या वेळी वीज सोडली जात आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देणे अडचणीचे झाले असून शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
या समस्येबाबत स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतरही अपेक्षित तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट अहिल्यानगर मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांनी वीजपुरवठा वेळापत्रकानुसार न झाल्यास नगर-सोलापूर महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
त्यानंतर अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन घोगरगाव परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांकडून यापुढे वेळापत्रकानुसार वीजपुरवठा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न
वीजपुरवठा अनियमित असल्याने शेतीसोबतच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विहिरी व बोअरवेलमधून पाणी उपसण्यासाठी वेळेवर वीज मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्या
घोगरगाव ३३/११ केव्ही उपकेंद्रातून घोगरगाव रूईखेल परिसराला पत्रकानुसार वीजपुरवठा करावा, रात्रीचा वीजपुरवठा शक्यतो सलग वेळेत द्यावा, उपकेंद्रावर तक्रारींसाठी जबाबदार कर्मचारी उपलब्ध करून द्यावा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सकाळच्या वेळेत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले असले तरी प्रत्यक्षात वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होतो की नाही, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. समस्या कायम राहिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

















