🔴 मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेसाठी श्रीगोंदा तालुका समन्वयकपदी गोरख कडूस पाटील व सागर शेळके!

नियुक्तीपत्र प्रदान; निवडीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदोत्सव, दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव!
राशीन (प्रतिनिधी) ऋषभ परदेशी. : मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या शेत-वहिवाटीचे रस्ते, शिवपाणंद आणि पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने अँड. गोरख कडूस पाटील व श्री. सागर दयानंद शेळके यांची श्रीगोंदा तालुका समन्वयक सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते दोघांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, दोघांचेही विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत, शेतीची कामे सुलभ व्हावीत आणि रस्त्यांअभावी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
‘शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी!’ या ध्येयाने नियुक्त समन्वयकांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतरस्त्यांचे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते न राहता प्रत्यक्ष कृतीतून मार्गी लागतील, असा विश्वासही शेतकरी बांधवांकडून व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीबद्दल अहिल्यानगर जिल्हा समन्वयक दादासाहेब जंगले पाटील (राज्य समन्वयक, शिवपानंद शेतरस्ते चळवळ, महाराष्ट्र राज्य) यांनी दोघांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

















