शासकीय कार्यालयांतील बायोमेट्रिक हजेरीचा मुद्दा ऐरणीवर; दीपक पाचपुते यांची कारवाईची मागणी
बायोमेट्रिक हजेरीची पडताळणी करूनच वेतन प्रक्रिया करा; आदेशाचे पालन न करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
राशीन| प्रतिनिधी ..ऋषभ परदेशी

जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनाची प्रक्रिया बायोमेट्रिक हजेरी नोंदीच्या आधारे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, या आदेशाची सर्व कार्यालयांमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचा दावा करण्यात येत असून, आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी केली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमित राहावी, कार्यालयीन कामकाजात शिस्त निर्माण व्हावी आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळावी, यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा वापर केला जात आहे.
पाचपुते यांच्या म्हणण्यानुसार, काही कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली उपलब्ध असतानाही उपस्थिती नोंदींच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी दरमहा बायोमेट्रिक हजेरीची पडताळणी करून त्याआधारे वेतन प्रक्रिया करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, बायोमेट्रिक हजेरीसंदर्भातील आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“शासकीय आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कार्यालयीन कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता वाढेल. नागरिकांना शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होईल,” असे पाचपुते यांनी म्हटले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
बायोमेट्रिक हजेरीची नियमित पडताळणी करून त्यानुसार वेतन प्रक्रिया केली जाते का, तसेच आदेशाचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

















