गणेशोत्सवाचा आनंद आणि त्यातच वरुणराजाचे आगमन! अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या बळीराजासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आता राज्याच्या विविध भागात पावसाने पुन्हा जोर धरला असून, देवळी तालुक्यात सर्वदूर रिपरिप सुरू झाली आहे. कधी जोरदार तर कधी हलक्या सरींच्या रूपाने बरसलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद झळकू लागला आहे.
राज्यासह वर्धा जिल्ह्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने पाठ फिरवली होती. मात्र आता हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यासह ठाणे, पालघर, परभणी, नंदुरबार, हिंगोली, बुलढाणा, जळगाव आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या बदललेल्या हवामानामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळत असून, एकूणच वातावरण टवटवीत झाले आहे.
पिकांना मिळाला संजीवनीचा आधार
गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या खंडामुळे देवळी तालुक्यातील सोयाबीन, कापूस आणि इतर पिके सुकण्याच्या मार्गावर होती. शेतकरी चिंतेत सापडले होते; परंतु या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरत आहे. असे असले तरी, जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी आणि पिकांच्या पूर्ण वाढीसाठी वर्धा जिल्ह्यात अजूनही एका चांगल्या, मोठ्या पावसाची गरज कायम आहे. बळीराजा आता आभाळाकडे डोळे लावून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे!








