सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त

राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी
राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी)
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अहिल्यानगर जिल्ह्यात तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत २६ व २७ ऑक्टोबर रोजी राहुरी आणि कोपरगाव येथील तीन अन्न व्यवसायांवर छापे टाकून खाद्यतेल, मसाला पावडर आणि मिरची पावडरचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची एकत्रित किंमत १० लाख ८० हजार ७४ रुपये २० पैसे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राहुरी येथून रिफाइंड सोयाबीन तेलाचा ६ लाख २१ हजार ६०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तेलाचा दर्जा निर्धारित मानकांनुसार नसल्याचा संशय आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली.
२७ ऑक्टोबर रोजी कोपरगाव येथून १,१६८.४ किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत सुमारे २ लाख ३७ हजार रुपये असल्याचे अहवालात नमूद आहे. निकृष्ट दर्जाचा संशय आणि अस्वच्छ वातावरणात साठवणूक केल्याच्या कारणावरून प्रशासनाने ही कारवाई केली.
त्याच दिवशी कोपरगाव येथून ८८ किलो मिक्स्ड मसाला पावडर आणि १७१ किलो स्पेशल मिरची पावडर असा एकूण १ लाख २१ हजार २०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित ठिकाणी लेबलिंग नियमांचे उल्लंघन तसेच अस्वच्छ परिस्थितीत साठवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) एम. यू. माने आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) ए. ए. भोईते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी यू. आर. पाटील आणि के. डी. जगदाळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सणासुदीच्या काळात खाद्यतेल व मसाल्यांची मागणी वाढत असल्याने अन्नपदार्थांची गुणवत्ता, लेबलिंग आणि साठवणुकीतील स्वच्छता तपासण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याचा अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळेतील तपासणी आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

















