*गिधाडांच्या संवर्धनासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक : डॉ. रणजित राऊत*
राशीन प्रतिनिधी ..( ऋषभ परदेशी )
*ग्रामीण आरोग्य प्रकल्पात आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिवस उत्साहात साजरा*

अहिल्यानगर : ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेड येथे आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक डॉ.रणजित रावसाहेब राऊत यांनी उपस्थित विद्यार्थी व सहभागी सदस्यांना गिधाडांचे पर्यावरणीय महत्त्व, त्यांच्या संवर्धनाची गरज तसेच गिधाडांच्या संख्येत होत असलेली घट याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ. रणजित राऊत म्हणाले की, “गिधाडे ही निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे स्वच्छतादूत असून मृत प्राण्यांचे अवशेष नष्ट करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गिधाडांच्या संवर्धनासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून, गिधाडांचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे.”
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना गिधाडांच्या विविध प्रजाती, त्यांचे अधिवास, पर्यावरणातील स्थान, गिधाडांसमोरील विविध धोके आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच गिधाड संवर्धन विषयक माहितीपत्रके व भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे समाजसेवक जयेश कांबळे, मोबाईल टीमचे सदस्य मधुकर वाळूंजकर, सुरेखा सोनवणे तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तुळजापूर चे विद्यार्थी अभिजित दाभणे, प्रशांत कुमार, रोहित ससाणे, नुपूर येवले, रूकुनुवो लिगीस व मयुखा व्ही. यांची उपस्थिती होती.
ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक डॉ. रवी दादा आरोळे व डॉ. शोभा ताई आरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गिधाडांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून जैवविविधता व वन्यजीव संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

















