🌧️ चाळीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राशीनमध्ये दमदार पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) : गेल्या तब्बल चाळीस दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या राशीन शहर व परिसरातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला. सोमवारी रात्री सुमारे एक तास दमदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. पावसासाठी अनेकांनी देवाकडे साकडे घातले, प्रार्थना व पूजा-अर्चा केली. पाण्याअभावी केवळ शेतीच नव्हे, तर पशुधन, प्राणी-पक्ष्यांनाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता.

अखेर झालेल्या दमदार पावसामुळे कोरड्या पडलेल्या जमिनीला ओलावा मिळाला असून पिकांना जणू संजीवनीच मिळाली आहे. मात्र पुढील काळात पावसाची सातत्यपूर्ण गरज असून, शेतकऱ्यांना आणखी समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे.
चाळीस दिवसांची प्रतीक्षा संपली; राशीनच्या धरतीवर पावसाने बरसवली संजीवनी!

















