स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!
ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी)

राशीन गावातील स्मार्ट मीटर सक्तीच्या मुद्द्यावरून महावितरण प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामपंचायत कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीचे अहिल्यानगर जिल्हा प्रभारी दत्तात्रय आत्माराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषण सुरू होऊनही कर्जत येथील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन उपोषणकर्त्यांची भूमिका जाणून घेत लेखी आश्वासन दिले नसल्याने उपोषण सुरूच आहे.

दरम्यान, राशीन येथील महावितरणचे अधिकारी जाधव यांनी उपोषणस्थळी येऊन चर्चा केली. मात्र, उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांवर ठोस लेखी आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलन मागे घेण्यास उपोषणकर्त्यांनी नकार दिला आहे. केवळ तोंडी चर्चा करून प्रश्न सुटणार नाहीत, तर प्रशासनाने अधिकृत लेखी भूमिका मांडून ग्रामस्थांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी कुठे अडकली?
राशीन ग्रामसभेचा ठराव क्रमांक २४/०४, दिनांक २७ जानेवारी २०२६ नुसार स्मार्ट मीटर संदर्भात संबंधित महावितरण अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी अद्याप का झाली नाही, याबाबत प्रशासनाने लेखी खुलासा द्यावा, असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
1\. ग्रामसभा ठराव क्रमांक २४/०४, दिनांक २७ जानेवारी २०२६ नुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी.
2\. नवीन वीजजोडणी घेणाऱ्या ग्रामस्थांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्यास, त्यासंबंधीचे नियम व अधिकृत आदेश ग्रामस्थांसमोर स्पष्ट करावेत.
3\. राशीन गावात यापूर्वी बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत ग्रामसभेच्या ठरावानुसार निर्णय घेऊन केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल ग्रामपंचायतीला द्यावा.
4\. स्मार्ट मीटरबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी ग्रामपंचायत, महावितरण अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करावी.
5\. ग्रामसभा ठरावाची अंमलबजावणी का झाली नाही, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा द्यावा.
6\. ग्रामस्थांच्या तक्रारींचे निराकरण होईपर्यंत कोणतीही अन्यायकारक सक्ती केली जाणार नाही, याबाबत लागू नियमांच्या चौकटीत अधिकृत भूमिका जाहीर करावी.
उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीला काही झाल्यास जबाबदार कोण?
आमरण उपोषण सुरू असताना प्रशासनाने अद्याप गांभीर्याने दखल घेऊन ठोस तोडगा काढलेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. कर्जत येथील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, सर्व मागण्यांवर लेखी आश्वासन द्यावे आणि चर्चेतून मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपोषणकर्त्यांचा प्रशासनाला थेट सवाल आहे की, ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असतील तर त्यावर निर्णय घेण्यास विलंब का? ग्रामसभेच्या ठरावाला प्रशासनाकडून किंमत दिली जाणार आहे की नाही? आमरण उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीला काही हानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार?
केवळ स्थानिक अधिकाऱ्यांकडून चर्चा करून प्रश्न प्रलंबित ठेवण्याऐवजी कर्जतच्या वरिष्ठ महावितरण प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. अन्यथा या आंदोलनाची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
उपोषणकर्ते व पाठिंबा देणारे ग्रामस्थ :
राजू सोनवणे, विशाल दीपक माने, श्रीकांत चंद्रकांत धुमाळ, आनंद भालचंद्र कांबळे, विठ्ठल चंद्रकांत गायकवाड, हरी दत्तू साळवे, भारत साळवे, भारत गेहलोत, अंगद दामोदरे, सुनील चितारे, अमोल जाधव, सूरज साळवे, माऊली प्रभाकर सायकर, किरण बाबा जाधव, अंकुश महादेव साळवे, गणेश साळवे, सूरज परदेशी.किसन लक्ष्मण आढाव आदी ग्रामस्थ आंदोलनात सहभागी आहेत.
आता प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण राशीन गावाचे लक्ष लागले आहे. ग्रामसभेचा ठराव, ग्रामस्थांच्या तक्रारी आणि आमरण उपोषण या तिन्ही बाबींचा गांभीर्याने विचार करून महावितरण प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

















