आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधातील युवक क्रांती दलाच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा
राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) : कर्जत तालुक्यातील रुग्णालयांमध्ये उपचारांचे दरपत्रक व डॉक्टरांची वैद्यकीय पात्रता दर्शनी भागावर लावावी, रुग्णांकडून जादा व अवाजवी शुल्क आकारू नये, अनावश्यक तपासण्या व उपचार लादू नयेत, तसेच खासगी रुग्णालये व लॅबची तपासणी करावी, या मागण्यांसाठी युवक क्रांती दलाने केलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कर्जत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. युवक क्रांती दलाने आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना पाठिंबा देत, रुग्णांच्या हितासाठी संबंधित मागण्यांवर प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली.

यावेळी लखन पारसे, ॲड. शुभम पानसरे, अंकुश साळवे, भाऊसाहेब जावळे, पोपट शेटे यांच्यासह राशीन व कर्जत परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्यसेवा ही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित बाब असल्याने रुग्णालये व खासगी लॅबच्या कामकाजात पारदर्शकता राहावी आणि रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तपासणी व कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

















