🦌 मांडवगण फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण जखमी; वनविभागाच्या ताब्यात उपचारासाठी रवाना..
अहिल्यानगर | श्रीगोंदा….प्रतिनिधी सागर शेळके: मांडवगण फाटा येथील मांडवगण–श्रीगोंदा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरीण जखमी झाल्याची घटना घडली. जखमी हरीण रस्त्यावर आढळून आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप, ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले.
जखमी हरणाला सुरक्षितपणे बाजूला घेऊन पुढील उपचारासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. वनविभागाचे अधिकारी काळे व वनरक्षक यांच्या ताब्यात हरणाला श्रीगोंद्याच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, पुढील उपचारासाठी पुण्याहून ॲम्बुलन्स येत असल्याची माहिती देण्यात आली.

जखमी हरणाला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी गाढवे यांच्या खासगी छोटा हत्ती वाहनाचा (एमएच १६ सीडी ७२५९) वापर करण्यात आला. या मदतकार्यात बाबासाहेब जगताप यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला.
मांडवगण–श्रीगोंदा मार्गावर अज्ञात वाहनाने हरणाला धडक दिल्याची प्राथमिक माहिती असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे काम वनविभागाकडून करण्यात येत आहे.

वन्यजीव रस्त्यावर आढळल्यास वाहनचालकांनी वेग कमी करून काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि जखमी वन्यजीव आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

















